लहानपणी आपण मस्ती करायचो खोड्या काढायचो मग आई आपल्याला सांगायची, की हे बघ, चुकीचे वागले , खोटे बोलले की बाप्पा शिक्षा करतो. मग आपण लगेच त्याची माफी मागायचो आणि आईच्या कुशीत शिरायचो. हेच संस्कार घेवून आपण लहानाचे मोठे होतो. व्यथा ही आहे की मोठे झाल्यावर आपण आपल्या आईला म्हणजेच प्रत्यक्ष स्वामीना सुद्धा विसरतो. आईचे संस्कार बर्यापैकी लोप पावतात कारण आपल्याला शिंग फुटतात.

आपल्या जीवन प्रवासात अनेक लोक आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात, पावलोपावली आपण त्यांच्या ऋणातच असतो पण अनेकदा हे विसरून आपण त्यांचा अपमान करतो, त्यांना दुखावतो, मला कोण अडवणार अश्याच वृत्तीचे आपले वर्तन असते . आपण चुकलो तर साधी माफी सुद्धा मागत नाही आपण खोटेपणाचा,

दांभिक पणाचा टेंभा घेवून मिरवत असतो. आयुष्यात पुढे जाताना कदाचित स्वतःच्याच कष्टांनी फळ मिळू लागते . ज्यांनी आपल्यावर संस्कार केले ज्यांनी मार्ग दाखवला पडत्या काळात मदतीचा हात दिला त्यांच्या खरतर ऋणात असतो आपण पण त्याचसोबत जोपासला गेलेला अहंकार आपल्यातील सतसत विवेक बुद्धी ला मारक ठरतो. वाटेल तसे वागायचा जणू परवाना मिळाल्यासारखे वागतो आणि तिथेच चुकतो.

आपल्या कष्टाचे फळ बाप्पा देतो पण मिजास केली तर ते काढून सुद्धा देतो हेही आईने सांगितले होते जे नेमके आपण विसरतो. अहो स्वामी कोण कुठले. ज्यांनी मदत केली त्यांना हवे तेव्हा जवळ करा हवे तेव्हा दूर करा ही वृत्ती बळावते कारण आपली विचार क्षमता हरवून आपल्याच कोशात मग्न असतो.

अश्याच एका उंच टोकावर जाऊन सर्व हातातून निसटून जायला लागते तेव्हाच आपल्याला शुद्ध येते पण वेळ निघून गेलेली असते . आपल्या चुका आठवतात पण माफी मागायची वेळ निघून गेलेली असते आणि ती मागायची आपल्यात हिम्मत सुद्धा नसते. माफी मागायला आणि ती करायला सुद्धा मन मोठे लागते आणि त्याला सद्गुरुकृपा सुद्धा लागते. रोज आपण आपल्यातील चुका शोधल्या पाहिजेत . इथे कुणी परिपूर्ण नाही प्रत्येक जण कधीना कधी चुकणार पण ती मान्य करायला वाघाचे काळीज लागते आणि त्या साठी गुरुकृपा लागते.

नुसेते उपास तप, व्रत वैकल्ये आणि पारायण करूं काही होत नाही कारण इतके सगळे करून आपण जैसे तिथेच आहोत. पण ज्या क्षणी ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते तेव्हा तरी आपण बदलले पाहिजे . अंतर्मानापासून आपल्यात बदल घडवायचा असेल तर मन निर्मळ हवे, अंतर्बाह्य एकच वृत्ती असायला हव्यात,
नियत शुद्ध हवी आणि राजकारणी धोरणी वृत्ती दूर हवी
तरच एखादा ज्ञानाचा किरण सापडेल.

आपल्याला कोण सुधारू शकतो तर आपण स्वतःच . ह्या जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे तर कर्म. एखादे कर्म केले कि त्याचे फळ त्याला चिकटले म्हणून समजा. आपण दुसर्याचा अपमान केला कि भविष्यात आपलाही होणार आणि तोही दसपट जास्ती आणि तेव्हा समजते सर्व काही पण वेळ निघून गेलेली असते.

अजूनही आपल्याला परमार्थ समजला नाही, भक्ती समजली नाही, समर्पित होणे जमत नाही, अहंकार जात नाही, दुसर्याचे मन समजत नाही त्यामुळे स्वामी समजणे हि खूपच दूरची गोष्ट आहे. ते समजण्यासाठी मनाचे शुद्धीकरण होणे अति आवश्यक आहे. मनाला येयील तसे वागलो तर स्वामीच काय ह्या भूतलावरील कुठलीच देवता आपल्याला आशीर्वाद देणार नाही मग तुम्ही काहीही कराल.

काय हवे आहे आपल्याला ह्याचा खरच एकदा शांतपणे बसून शोध घ्या. हारतुरे, सत्कार, वाहवा, प्रसिद्धी नक्की काय हवे आहे . आपल्या महाराजांना सुद्धा जिथे ह्या सगळ्याचा मोह नाही तिथे आपल्याला कश्याला हवा आहे ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन सुद्धा तिथे आपण एकटेच असू कारण ह्या सर्वच गोष्टींचा तिटकारा असणारे सद्गुरू आपल्यासोबत नसतील. आपण त्यांचे धरलेले बोट कधीच सुटले आहे ह्याची सुद्धा जाणीव नाही आपल्याला इतके आपण आपल्याच विश्वात रमलो आहोत .

आयुष्यत प्रत्येक गोष्टीत समर्पण लागते . स्वयपाक करताना गृहिणीला त्यात जीव ओतावा लागतो तेव्हाच त्याला चव येते. तसेच प्रपंच ते परमार्थ हा अवघड प्रवास पार तोच करू शकतो जो स्वतःला गुरु चरणी ” समर्पित ‘ करतो. मला महाराज खूप आवडतात … अहो पण तुम्ही त्यांना आवडता का? त्यांच्या आवडी निवडीचे काय ? आपल्या लहानपणी बाप्पा होता आणि तो अजूनही आहेच . त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम आणि वेळप्रसंगी भीती आजही तितकीच वाटली पाहिजे किबहुना काकणभर अधिकच तेव्हाच आयुष्याची संध्याकाळ सुकर होईल नाहीतर सर्व व्यर्थ आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *